Ashadhi Wari 2023: लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघाले असताना आता या महासोहळ्यात राजकीय वारीसाठी दुसरा एक वारकरी थेट तेलंगणा वरून पंढरपूरला येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेला राजकीय रंग चढणार असे चित्र दिसू लागले आहे. 'अब की बार, किसान सरकार' असे म्हणत महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत असणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात येण्याच्या एक दिवस आधीच के. चंद्रशेखर पंढरपूरमध्ये हजेरी लावणार आहे.

आषाढीला गेली अनेक वर्षे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगविजयसिंग येत असतात. पण ते फक्त श्रद्धेसाठी इतकी वर्षे वारी करीत आहेत. मात्र देशात शेतकऱ्यांचे राज्य आणण्याची घोषणा देत कामाला लागलेले चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत. यातच महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार अधिक जलदपणे करण्यासाठी 'बीआरएस'ने वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा महासोहळ्याची निवड केली आहे. यासाठी त्यांनी आषाढ शुद्ध नवमीची निवड केली आहे. या दिवशी चंद्रशेखर राव हे पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. देशात शेतकऱ्यांचे राज्य येऊ दे असे साकडे ते शेतकरी , कष्टकऱ्यांच्या या देवाला करणार असल्याचे बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक शंकर आण्णा धोंडगे यांनी सांगितले आहे.

चंद्रशेखर राव हे 27 जून रोजी पंढरपूरला येतील. विठ्ठल दर्शनासोबत ते वारकऱ्यांशी संवाद साधतील असे नियोजन केल्याची माहिती आहे. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दशमी दिवशी म्हणजे 28 जून रोजी पंढरपूरमध्ये येणार आहेत. त्याच्या एक दिवस आधी चंद्रशेखर राव पोचणार आहेत. आषाढी पूर्वीच पुणेपासून सर्व पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे. यातच आता खुद्द या पक्षाचे अध्यक्ष पंढरपूरला येणार असल्याने या आषाढी यात्रेत राजकीय वातावरण देखील तापणार आहे.

काही दिवसापूर्वी पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन बीआरएस पक्षात प्रवेश संदर्भात चर्चा केली होती. भगीरथ भालके यांना तेलंगणामध्ये आणण्यासाठी के चंद्रशेखर राव यांनी खास विमान पाठवले होते. आता आषाढीला राव येत असताना त्यांच्या जोरदार स्वागतासाठी भगीरथ भालके आणि त्यांची भलीमोठी टीम सज्ज असणार आहे. आता आषाढीला येणाऱ्या या राजकीय नेत्यांपैकी पंढरीचा पांडुरंग कोणाला पावणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bharat-rashtra-samiti-chief-and-telangana-chief-minister-k-chandrasekhar-rao-will-visit-pandharpur-viththal-mandir-on-ashadhi-ekadashi-eve-1186191
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bharat-rashtra-samiti-chief-and-telangana-chief-minister-k-chandrasekhar-rao-will-visit-pandharpur-viththal-mandir-on-ashadhi-ekadashi-eve-1186191
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: