Maharashtra rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईत पावसाचा जोर वाढला, सखल भागात साचले पाणी

मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. असा जोरदार पाऊस सुरु राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरुन जाणार आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. मागील अर्धा पसापासून मुंबई उपनगरातील दहिसर भागात सुरू झालेल्या पावसामुळे दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळील सुहासिनी पावसकर सबवे परिसरात कमरे इतके पाणी साचले आहे यामुळे या भागातून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता.

वाशिम

वाशिम जिल्ह्यात मध्यरात्री अनेकभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. सलग दोन दिवस बरसणाऱ्या या पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा पसरला आहे.

पैठण तालुक्यात पावसाचं आगमन

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचा आगमन झालं आहे. पैठण तालुक्यात पाचोडसह अनेक गावांमध्ये वरुनराजा बरसला. या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सोलापुरात नागरिकांच्या घऱात शिरले पाणी

सोलापुरात झालेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले आहे. पहिल्याच पावसामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांना फटका बसला आहे. शहरातील 70 फूट रोडमुळं कोनापुरे चाळ परिसरात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिक संतप्त झाले. तर शहरातील प्रमुख बाजारपेठांपैकी असलेल्या गणेश शॉपिंग सेंटर या ठिकाणी दुचाकी वाहने पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळालं.

वसईमध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला

वसईमध्ये एका जर्जर इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक सुरु झालेल्या पावसाने वसईच्या हत्तीमोहला परिसरातील एका जर्जर इमारतीचा भाग कोसळळा. जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसात एका इमारतीचा सज्जा कोसळल्यानं जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पहिल्याच पावसाने मीरा भाईंदर जलमय

पहिल्याच पावसात मीरा भाईंदर महापालिकेचे नाले सफाईचे दावे उघड केले आहेत. पहिल्याच पावसानंतर भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्लीत पावसाचे पाणी साचले. पाणी साचल्यानं परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी पावसाच्या आधी सर्व नाले आणि गटार सफाई करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यामुळे यावेळी पावसाचे पाणी कुठेही साचणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र पहिल्याच दिवशी याच मुसळधार पावसाने महापालिकेचे सर्व दावे उघडे पाडले आहेत.

पालघर

पालघर जिल्ह्यातपावसानं चांगलाच जोर पकडला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस पडत असल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासह नागरिकही सुखावले आहेत. तर अनेक दिवस पेरणीसाठी पावसाची वाट पाहत असलेले शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-news-rainfall-in-various-parts-of-state-including-mumbai-imd-weather-1186998
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-news-rainfall-in-various-parts-of-state-including-mumbai-imd-weather-1186998
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: