Kolhapur Vishalgad: कोल्हापूरमधील विशाळगड (Vishalgad Fort) परिसरातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पशुबळी प्रथेवर यावर्षी घालण्यात आलेल्या बंदीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका असे खडेबोल हायकोर्टानं (High Court) दोन्ही बाजूंना सुनावले आहेत. तूर्तास या बंदीच्या आदेशाला कोणतीही अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत या याचिकेवर राज्य सरकारला 5 जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली आहे.

प्रशासनानं घातलेली ही बंदी निव्वळ राजकीय हेतूनं आहे. मुळात ही धार्मिक प्रथा हिंदू मुस्लिम ऐक्यात पिढ्यान पिढ्या इथं सुरू असताना आता अचानक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करत आहेत. त्यामुळेच प्रशासनानं ही बंदी घातली आहे. असा आरोप करत हजरत पीर मलिक रेहान मिरा साहेब दर्गा ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. त्यावर गुरूवारी न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

आजच्या सुनावणीत हायकोर्टानं स्पष्ट केलं की, विशाळगड परिसरात प्राण्यांच्या अशा नियमबाह्य कत्तलीला परवानगी देता येणार नाही. सणाच्या आयोजकांनी तिथं स्वच्छता राखण्याची आज गरज आहे, दरवर्षी अशा अनेक रिट याचिका हायकोर्टात येतात. त्यामुळे नागरी स्वच्छता आणि नागरी विचारांचे पालन करताना सार्वजनिक स्वच्छतेचंही भान राखायला हवं असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं.

काय आहे याचिका

याचिकेत म्हटले आहे की, या प्रथेवर प्रथमच यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी बंदी घालण्यात आली आहे. परमेश्वरासाठी बळी देण्याच्या नावाखाली पशुपक्षांच्या बेकायदा कत्तलीवर यंदा बंदी असेल, असं पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी आपल्या आदेशात म्हटलेलं आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासनानही आपापल्यापरिनं बंदीचे आदेश जारी केले. पुरातन आणि संरक्षित वास्तू असलेल्या विशाळगडाच्या आवारात 11 व्या शतकात हा दर्गा उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी मुस्लिम भाविकांबरोबरच हिंदू भाविकही पिढ्यानपिढ्या तितक्याच भक्तीभावानं येत असतात.

प्राचीन काळी कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्यांचा बळी देऊन गरीबांना अन्नदान करण्याच्या हेतूनं सुरू झालेली प्रथा कालांतरानं धार्मिक प्रथा बनली. मुळात विशाळगड आणि दर्गा यामध्ये सातशे मीटरचं अंतर आहे. या दोन्ही वास्तू एका टेकडीनं विभागल्या गेल्या आहेत. तसेच इथं बनवण्यात येणारं जेवण हे दोन वेगवेगळ्या बंदिस्त भागांत तयार होतं. त्या जागा सुद्धा विशाळगडापासून एक किमीच्या अंतरावर आहेत. इतकेच नव्हे तर ट्रस्टकडून पूर्वीपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रमाणपत्र घेऊन आणि त्याचं वेळोवेळी नूतनीकरण केलं जातं. परंतु, यावर्षी प्रथमच महाशिवरात्रीच्या तोंडावर बळी प्रथा बंद करण्याची मागणी करत काही हिंदुत्ववादी संघटना वातावरण बिघडवत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला. या हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाला बळी पडूनच प्रशासनानं ही बंदी घातली आहे, असा थेट आरोप या याचिकेत करत बंदीचे हे आदेश रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ban-on-animal-sacrifice-tradition-at-vishalgad-fort-kolhapur-pil-hearning-at-bombay-high-court-1184562
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ban-on-animal-sacrifice-tradition-at-vishalgad-fort-kolhapur-pil-hearning-at-bombay-high-court-1184562
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: