नागपूर: वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागपूर (Nagpur) हादरलं आहे. उपराजधानी नागपुरात 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली असून जीवघेण्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे, त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपुरातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांमुळे पोलीस प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होत आहे.

हत्येची पहिली घटना

जरीपटका पोलीस स्टेशनअंतर्गत नारा परिसरात काल रात्री उशिरा हत्येची पहिली घटना घडली. महेश कुमार उईके या तीस वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शेजारीच राहणाऱ्या राजकुमारी उईके आणि करण नावाच्या मजुरांनी मिळून मजुराची हत्या केली. महेश ही मजूर शेजारी राहणाऱ्या राजकुमारीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्याच रागातून राजकुमारीने आपल्या पुरुष मित्र करणच्या मदतीने महेशवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलं. रविवारी (20 ऑगस्ट) रुग्णालयात उपचारादरम्यान महेश उईके याचा मृत्यू झाला.

हत्येची दुसरी घटना

यशोधरा नगर पोलीस स्टेशनअंतर्गत कांजी हाऊस चौकात रविवारी संध्याकाळी सात वाजता हत्येची दुसरी घटना घडली. बादल पडोळे या पंचवीस वर्षीय कुख्यात गुन्हेगाराला परिसरातीलच चेतन सूर्यवंशी नावाच्या दुसऱ्या गुन्हेगाराने धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारलं. गुन्हेगारी जगतातील जुन्या वैमनस्यातून बादलची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

हत्येची तिसरी घटना

हत्येची तिसरी घटना काटोल नाक्याजवळ उघडकीस आली. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला ट्रक चालक मेहबूब खान याचा मृतदेह रविवारी काटोल नाक्याजवळील एका नाल्यात आढळून आला. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथून ट्रकमधून कृषीजन्य पदार्थ भरून नागपूरला आणण्यासाठी गेलेले मेहबूब खान दहा दिवसांपासून बेपत्ता होते. ते बेपत्ता असल्याची तक्रार नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती, तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. रविवारी (20 ऑगस्ट) दुपारी त्यांचा मृतदेह काटोल नाका जवळील नाल्यात आढळून आला, त्यांची हत्या सोबतच्या ट्रक चालकांनी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

हत्येच्या प्रयत्नाची चौथी घटना

हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत खरसोली गावात लहान मुलाच्या नामकरण सोहळ्यात नाचण्याच्या मुद्द्यातून झालेल्या वादातून सुखदेव उईके (55 वर्ष) आणि रेखा उईके (50 वर्ष) या दाम्पत्यावर त्याच परिसरात राहणाऱ्या दिनेश पाटील नावाच्या व्यक्तीने चाकूने हल्ला केला आणि दोघांना गंभीर जखमी केलं. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी दिनेश पाटील याचा शोध सध्या सुरू आहे.

हेही वाचा:

पत्नीचे अनैतिक प्रेमसंबंध, पतीने उचललं टोकाचे पाऊल; औरंगाबाद सिल्लोडमधील धक्कादायक घटना

source https://marathi.abplive.com/news/nagpur/nagpur-crime-has-increased-in-nagpur-three-killed-two-injured-in-24-hours-1202883
source https://marathi.abplive.com/news/nagpur/nagpur-crime-has-increased-in-nagpur-three-killed-two-injured-in-24-hours-1202883
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: