Pandharpur: डोक्यावर 42 डिग्रीचे जीवघेणे ऊन, खाली तापलेली जमीन आणि अशा अवस्थेत तहानलेल्या हजारो विठ्ठल भक्तांना दर्शन रांगेत तासंतास उभं राहून होत असलेले हाल... याचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी एबीपी माझाच्या बातमीच्या दणक्यानंतर विठ्ठलाच्या दर्शन रांगेत मॅट टाकण्यात आले आहे, त्यामुळे आता भाविकांना दर्शन घेणं थोडं बरं पडत आहे. दुर्दैवाने ज्या भागातील अवस्था माझाने दाखवली होती, केवळ तेवढ्याच भागात हे मॅट टाकण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच दर्शन रांगेत लवकरच मॅट टाकण्यात येतील, अशी अपेक्षा आहे.

शनिवारी (10 जून) चंद्रभागा घाट, सारडा भवन या भागातील दर्शन रांगेत रबरी मॅट टाकल्याने भाविकांना पाय न भाजता विठुरायाच्या दर्शनाला जाण्याचा आनंद घेता येत होता. आज दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याचीही अतिरिक्त व्यवस्था केल्याने भर उन्हात भाविकांना पिण्याचे पाणीही मिळत असल्याचे भाविकांनी सांगितले, त्यामुळे भाविकांना थोडा दिलासा मिळाला. एबीपी माझाने दोन दिवस भाविकांच्या या मरणयातना दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी यात लक्ष घालून तातडीने मॅट टाकण्याचे आदेश दिल्यावर मंदिर प्रशासनाने हे रबरी मॅट भाविकांना चालण्यासाठी टाकले आहेत.

यंदाच्या आषाढी यात्रेत उन्हाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात असून यात्रा काळात मंदिर परिसरात येणाऱ्या हजारो भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी मंदिराच्या चारही बाजूला पत्र्याचे मंडप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात्रा काळात हजारोंच्या संख्येने भाविक हे मंदिर परिसरात येत असतात. यातच यंदा सूर्यदेवाचा प्रकोप इतका वाढत आहे की, अशा उन्हात भाविकांना उष्माघाताचा त्रास जाणवू नये यासाठी शासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच सध्या मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी बांधलेले कापडी मंडप काढून तेथे जास्त उंची असलेले आणि यात प्रकाश आणि हवेची व्यवस्था असणारे मंडप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

विठु नगरीत सध्या असलेले कापडी मंडप अनेक ठिकाणी फाटले असून यात आग लागण्यासारखा धोका उद्भवू शकतो, याची जाणीव शासनाला असल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. या सर्व सोयींमुळे आषाढी काळात मंदिर परिसरात येणाऱ्या हजारो भाविकांना आता पाय न भाजता सावलीमध्ये मंदिर परिसरात दर्शनासाठी येता येणार आहे. महाद्वार ते नामदेव पायरी, चौफाळा ते पश्चिम द्वार आणि संपूर्ण मंदिर प्रदक्षिणा मार्गावर अशा पद्धतीचे पत्र्याचे मंडप उभारले जाणार आहेत. यासाठी सध्या असलेल्या वीजपुरवठा व्यवस्थेत देखील बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या मार्गावर असणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांना मागच्या बाजूने विजेचे कनेक्शन दिले जाणार आहेत.

एकंदर, यंदा आषाढीला विक्रमी गर्दी होत असताना शासनाने या तीव्र उष्णतेबाबत खबरदारी घेतली आहे. आता आषाढी काळात मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी ही मोठी खुशखबर असून त्यांना आता सावलीत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन मिळणार आहे.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/g98CTz7 Wari: आषाढीला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती बनवणार 15 लाख लाडू

source https://marathi.abplive.com/lifestyle/religion/ashadhi-wari-mats-for-devotees-in-vitthal-mandir-pandharpur-in-darshan-que-pandharpur-maharashtra-1183179
source https://marathi.abplive.com/lifestyle/religion/ashadhi-wari-mats-for-devotees-in-vitthal-mandir-pandharpur-in-darshan-que-pandharpur-maharashtra-1183179
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: